Skip to main content

मी भूत पाहिलंय, तुम्ही?


                  दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी न जाता माझ्या मुळ गावी  'साखळी', जिथे माझे काका- काकू, आजी- आजोबा राहतात तेथे गेलो. मामाच्या घरी का नाही गेलो? याचे उत्तर काही माझ्या जवळ नाही पण, मागल्या वर्षी काकांनी मला 'साखळी'ला बोलवल्यावर काकू म्हणाली, "तो कसला येतोय? मामाला दोन मुली असल्यावर." झालं काकुंनी असा टोमणा मारला म्हटल्यावर कोण जातयं हो मामाच्या घरी. मग ठरवलं की, यावर्षी उन्हाळा काकांच्याच घरी.                                                                             .                       काकांच्या घरासमोरच माझा बालसवंगडी  राहायचा. त्याचे नाव महेश पण, लाडाने आम्ही सगळे मित्रगण त्याला 'म्हश्या' म्हणायचो. त्याच्या सोबत गप्पा मारताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लहानपणी आम्ही सर्वजण (मित्रपरिवार) शेतात दिवसभर हुंदडायला जायचो. आळीपाळीने एकमेकांच्या शेतात जायचो. पण आमच्या सर्वांच्या आवडीचे शेत म्हणजे म्हश्याच्या मामांचे शेत. म्हश्याच्या घरी शेतच नव्हते. म्हणून आम्ही त्याच्या मामाच्या शेतात जायचो.सकाळीच शेतात जाऊन, रात्रीतून पडलेले बेल्याचे (बेला नावाचे भले मोठे आंब्याचे झाड होते) पाड जमा करायचे. शेताच्या बांधाला लागूनच एक भला मोठा ओढा होता. त्यात उतरून खेकडे पकडायचे. खेकडे खात नसलो तरी पकडायचा भारी शौक. शेतातल्या बकरीचं दुध काढं, दुसऱ्याचे आंबे पाड, गुल्लर तयार करून कोणाचा दगड दूर जातो हा खेळ. असले उद्योग करून झाल्यावर आमचा मोर्चा वळायचा तो विहिरीकडे. 2-4 उड्या मारल्याखेरीज आम्ही कधीच घरी आलो नाही. म्हश्याच्या मामांची विहीर होतीच तशी प्रशस्त आणि सुसज्ज. विहिरीत उतरायला कड्या होत्या. मजबूत बांधलेली होती. खडकही व्यवस्थित छाटलेले होते. पोहताना कधीच कोणाच्या पायाला खडक लागल्याचे आठवत नाही. फाउंडेशन ही राखीव उंचीवर होते. त्यावरून उड्या मारायला फार मज्जा यायची. गप्पा रंगल्या असतानाच काकूंनी गरमा गरम चहा आणला. चहा पिता पिता म्हश्याला मी हळूच विचारले, "जायचे का? शेतात उद्या."          " उद्या ......नाही यार दिवसा फार काम आहे." असे अनपेक्षीत उत्तर मला मिळाले.                                " मग संध्याकाळी जावूया." मी म्हटले. यावर त्याने होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात म्हश्याच्या आईची हाक कानी पडताच तो निघून गेला.                                                  
                आमचा संवाद काकूंनी ऐकलाच होता. त्यांना माझी अन महेशची मैत्री आवडायची नाही. म्हश्याचे घर समोरच असल्यामुळे त्याचे सगळे कारनामे काकूंना तोंडपाठ होते. त्यांनी एक-एक सांगण्यास सुरुवात केली. गावात उनाडक्या वाढल्यामुळे त्याची रवानगी आदिवासी शाळेत झाली होती. तेथूनही तो पळून आला. आता शिक्षणाला पूर्णविराम होता. कामाचा तर त्याला खूप कंटाळा होता. घरचे सगळे त्याला वैतागले होते.                                                                       

               उद्या शेतात गेल्यावर ढुंकूनही त्या विहिरीकडे पाहायचे नाही, अशी तंबी काकूंनी मला दिली. "विहीर आता पहिल्यासारखी राहिली नाही." काकू सांगत होत्या. विहिरीत गवत माजलंय, शेवाळ साचलंय, काडीकचरा, पालापाचोळा आहे. मागे गावातल्या बाईने विहिरीत जीव दिला होता. 1-2 जणांचे पाय त्या विहिरीत कोणीतरी पकडले होते, असंही काकूंनी ऐकलं होत.                                                     
               दुसऱ्या दिवशी दिवसभराची कामे उरकून म्हश्या घरी आला, तेव्हा दुपारचे 4 चे टोल घड्याळाने दिले होते. शेतात फिरता फिरता मी म्हश्याला काकूंनी सांगितल्याप्रमाणे शहानिशा करण्यासाठी विहिरीबद्दल विचारले, तर साहेबांनी अजून 2-4 आत्महत्या वाढवून सांगितल्या. तरीसुद्धा मी त्या विहिरीकडे जाण्याचा हट्ट म्हश्याकडे करू लागलो. पण फक्त वरून बघून येवू या अटीवर तो तयार झाला.                                                                                                        विहिरीजवळ जाताच मला धक्का बसला. विहीर पार जुनाट दिसत होती. हीच ती लहानपणीची विहीर, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. काकूंनी सांगितल्याप्रमाणे विहिरीत गवत, शेवाळ, नको असलेली रोपटी, पालापाचोळा अगदी सगळं होत. पण माझी नाळ त्या विहिरीशी इतकी घट्ट होती की, मी आपसूकच विहिरीत उतरु लागलो. माझ्या पाठोपाठ म्हश्याही उतरला. सर्व गवत उपटले, शेवाळ काठीने गोळा करून काठावर टाकले. एवढा कचरा असूनही खाली उतरण्याच्या कड्यांवर थोडीसुद्धा धुळ नव्हती याचे मला आश्चर्य वाटले. कुठेच जाळे नव्हते की, किडे-किटकुलं नव्हते. यावरून येथे रोज कोणाचा तरी वावर असावा असे मनात येवून गेले.                                                                    
               विहिरीतील साफसफाई होताच कड्यांना धरून वर चढत असताना माझे लक्ष एका खडकाकडे गेले त्यावर लिहिले होते ' मला राग येतोय', मला त्याचा हसू आला. मी ते पाण्याने धुवून, पुसून टाकले. बहुदा खडूने लिहिले असावे. बाहेरही आता अंधार पडला होता. मस्त वातावरण झाले होते. रोज याच वेळी पोहायला यायचे असे ठरवून आम्ही घराकडे परतलो.                                                                                               दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही पोहायला गेलो तर अवाकच झालो. विहिरीत परत कचरा साचला होता. पालापाचोळा पडला होता. आजूबाजूला कोणते झाडही नव्हते, पानं पडायला. मग ही येतात कुठून? आता मात्र मला भीती वाटू लागली. काकूंनी आणि म्हश्यानी सांगितलेल्या आत्महत्येच्या गोष्टींशी मी याचा मेळ घालू लागलो. पोहून झाल्यावर कालच्या खडकाकडे बघितलं तर परत तेच लिहिलेलं होतं 'मला राग येतोय'. मी परत खोडून टाकलं, म्हश्याच्याही नजरेस ही गोष्ट आणून दिली. त्याला सुद्धा याचे अप्रुफ वाटले.                                                                                              संध्याकाळी 2-3 दिवसापासून सतत आम्ही पोहायला जावू लागलो. परत तेच कचरा, खडक, 'मला राग येतोय.' पोहून झाल्यावर मी म्हश्याला म्हटलं, " बाबा रे आपण काकांच्या विहिरीत उतरत जावू उद्यापासून, या विहिरीत नको. यावर तो जोरजोरात हसायला लागला आणि म्हणाला, "काय भितोस रे तु , लहानपणापासून फट्टूच आहेस तु. जरा मोठा हो." ते म्हणतात ना अपमानाची पोळी सर्वांग जाळी. हा अपमान सहन न होवून मी पण उधार अवसान घेत म्हटलं, " ऐ चल रे, घाबरतंय कोण? तू जरी नाही आलास ना तरी एकटा पोहू शकतो म्हटलं मी."                                                    

             दुसऱ्या दिवशी म्हश्या सायंकाळी 5 वाजता घरी आला ते पण पोहायला जाण्यासाठी नव्हे तर, "मी आज येणार नाही " हे सांगायला आला होता पठ्ठया. त्याची मावशी 6 वाजता येणार होती. तर तो बसस्थानकावर मावशीला घेण्यास जाणार होता. जाता जाता भाऊने हळूच पिन मारली, "आज अमावस्या आहे बरं ! जाशील नाही तर एकटाच." मला तर पहिलेच भीती वाटत होती, वरून म्हश्या सोबत नव्हता, त्यात अमावस्या. जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. पण म्हश्याचे शब्द कानात घुमु लागले, "लहानपणापासूनच फट्टूच आहेस तु." मीपण त्याला, " तु जरी नाही आलास ना तरी एकटा पोहेन." असे आव्हानात्मक उत्तर देवून टाकले होते. मला काय माहित दुसऱ्याच दिवशी आपल्यावर ही वेळ येणार आहे. या ठिकाणी माझ्या स्वाभिमानाने उसळी मारली. आता जावूनच पाहू 'आर या पार' या इराद्याने मी शेताकडे निघालो.                                                                               
   आज चक्क 6 वाजले होते घरून निघायला. ज्या वेळी आम्ही रोज घरी परतत होतो, त्यावेळी तर मी विहिरीत उतरणार होतो. आज पावले एकदम हळू पडत होती. ती नेहमीपेक्षा जडही वाटत होती. मनात सतत धाकधुक आज अमावस्या आहे, काही होणार तर नाही ना. काकूंनी सांगितल्याप्रमाणे कोणी आपला पाय पाण्यात धरून ठेवला तर, बापरे ! फक्त मी फट्टू ठरू नये एवढे सिद्ध करण्यासाठीच माझा आटापिटा सुरु होता.                                                                 

              शेताच्या वाटेने कुणी चिटपाखरू सुद्धा नव्हते. त्या निरव शांततेत मला अजूनच भकास वाटू लागले. फक्त एक डुबकी मारून वापस यायचे या इराद्याने आता मी झपाझप चालू लागलो. आता किंचितसा उजेड शिल्लक होता. सूर्य देवाने सुद्धा अमावस्येचा काढता पाय घेतला जणू. विहिरीत उतरून पहिले ते खडकावरले 'मला राग येतोय' पुसुन काढले. पण आज मात्र ते काही मिटेनाच. कितीही रगडले तरी ते दिसतच होते. ओल्या खडूने लिहिले असावे बहुदा, अशी मनाची समजूत घालून  विहिरीत उतरू लागलो. मला ती अजूनच मोठी व रुंद वाटू लागली. पाणी पातळी खोल गेल्यासारखी वाटू लागली. खाली उतरून वर पाहिल्यावर विहीर गोल गोल फिरत आहे असा भास झाला. डोळ्यासमोर अंधारी आली. एरव्ही शांत असणारे पाणी मी मी म्हणत होते. मला ते खुणावत होते. कचरा साफ करण्याच्या फंदात आज मी पडणार नव्हतो, नुसती डुबकी मारून तर वापस येणार होतो मी. आवंढा गिळत, जीव मुठीत धरून मी पाण्यात पाऊल टाकले. पाणी रोजपेक्षा आज जरा जास्तच गार होते.                         
    
                डुबकी मारल्याबरोबर हृदयाची धडधड जाणवू लागली. ते सगळे असह्य होवून मी पाण्याबाहेर पडू लागताच कोणीतरी पाण्यात माझा पाय पकडला.खाली बघण्याची हिंमत ही होईना.आता मात्र थंडगार पाण्यातही मला दरदरून घाम फुटला. मी रडू लागलो."बाबा मला वाचवा...!" जोरजोरात किंचाळू लागलो. सोडा ss सोडा मला. मी परत नाही येणार विहिरीत. पण आता सोडा मला. आई गं वाचव मला. मी रामनामाचा जप चालू केला. पूर्ण 33 कोटी देवांचा दोनदा जप केला असेल त्यावेळी. वरच्या कडीला धरून जोर काढला तर चमत्कारिकपणे माझी त्यातून सुटका झाली.कड्यांना धरून मी झपाझप वर चढू लागलो.खाली बघण्याचा तर प्रश्नच नव्हता. बाहेर कुत्रे भुंकण्याचा आवाज येवू लागला. कोणीतरी विहिरीच्या काठावर आहे याची मला चाहुल लागली. वर चढता चढता माझा पाय कडीवरून सटकला. आता मी हाताच्या जोरावर लोंबकळू लागलो. पायाला ती कडीही लागेना. खाली बघून कडीवर पाय आरामशीर ठेवता आला असता पण, खाली बघून जर त्या आत्महत्या केलेल्या स्त्रीचा हसरा चेहरा, केस मोकळे सोडलेली पांढरी प्रतिकृती दिसली असती म्हणजे जागेवरच 'रामनाम सत्य है' झालं असतं म्हणून खाली न बघता मी कसाबसा वर चढून आलो. बाजुलाच निळ्या रंगाच्या तुटक्या चपला पडल्या होत्या, बहुधा भुताच्या असाव्यात. पायात कश्याबश्या चपला सरकावल्या. कपडे उचलले आणि भिर पळत सुटलो. आईशपथ त्या दिवशी एवढ्या जोरात पळालो की, उसेन बोल्टला सुद्धा पाणी पाजलं असतं.                                                                                                           वेशीवर हनुमान मंदिर होतं, तेथे कपडे घातले, थोडा शांत झालो आणि काही झालेच नाही या आविर्भावात गावात प्रवेश केला. घरी कोणाला काही कळू नये म्हणून जेवूण सरळ अंथरूणाकडे वळलो. विहिरीमध्ये घडलेले सर्व डोळ्यापुढे परत परत येत होते. डोळ्याला डोळा लागत नव्हता. उद्या घडलेले सर्व म्हश्याला सांगायचे आणि परत कधीच त्या विहिरीकडे फिरकायचे नाही असे ठरवून कधी झोप लागली देव जाणे....                                                                        -×-×-×-                                            
          दुसऱ्या दिवशी सकाळी एका भयंकर स्वप्नाने माझी झोप उडाली. काकूंना नवल वाटले की, एरव्ही 10 वाजेशिवाय न उठणारे साहेब आज 7 वाजताच कसे काय उठले? पण त्यांना काय सांगणार माझ्यावर काय बेतली ते. आंघोळ वगैरे आटपून, पोटात प्लेटभर पोहे ढकलून मी म्हश्याला कालची हकिकत सुनावण्यास निघालो.                                                     

              महेश sss म्हणून आवाज दिला तर काकू (महेशची आई) बाहेर येवून सांगू लागल्या की, तो सकाळीच त्याच्या मामांबरोबर शहरात चप्पल खरेदीसाठी गेला आहे आणि येता येता मावशीला पण घेवून येणार आहे. हे ऐकून तर मला धक्काच बसला. मला तर म्हश्याने सांगितले होते की, तो कालच मावशीला आणायला बसस्थानकावर गेला होता म्हणून. काहीतरी घोळ असल्याचा संशय मनात येवू लागला. कुठेतरी पाणी मुरत होतं. निघता निघता मी काकूंना विचारले, "महेशची तुटलेली चप्पल निळ्या पट्ट्याची स्लीपर होती का?" तर काकू "हो" म्हणाल्या. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. काल रात्री विहिरीजवळ जी चप्पल तुटून पडली होती ती म्हश्याची होती तर. म्हणजे कालच्या प्रकरणाचा आणि म्हश्याचा जवळचा संबंध होता.                                               

                 म्हश्या दुपारी 4.30 च्या सुमारास घरी आला. मला म्हणाला "अरे, जायचे नाही का  पोहायला?" मी पण त्याला काही झालेच नाही असे दाखवत त्यासोबत विहिरीजवळ आलो. तेथे तुटकी चप्पल नव्हती. scene एकदम रोजच्यासारखा सजवून ठेवला होता. खडकावर नेहमीचंच होतं 'मला राग येतोय.' हळूच मी त्याच्या वर लिहिलं 'आता माझी सटकली.' ते पाहून म्हश्या व मी फिदीफिदी हसू लागलो. म्हश्या आव आणून हसत होता. काल माझा जेथे कोणी पाय पकडला होता, त्याठिकाणी पाण्यात पाहिलं तर एक वेल तुटून पडली होती.आता माझे मलाच हसू येवू लागले, काल रात्रीचा तो गोंधळ आणि माझी घाबरगुंडी आठवूण. मनसोक्त पोहून आम्ही घरी आलो. जेव्हापासून मी खुश होतो, तेव्हापासून म्हश्याचा मात्र चेहरा पडला होता. पण तसा तो समजू देत नव्हता.                                                                             
               2-3 दिवसानंतर म्हश्यानी मला काहीतरी सबब सांगून पोहायला येणार नसल्याचे सांगितले. आज परत मी एकटाच जाणार म्हणून काहीतरी घडणार आणि ते पुर्वीपेक्षाही जालीम असणार हे माहित असल्यामुळे पूर्ण तयारीनिशी मी निघालो. तत्पूर्वी मी माझा मित्र सुरेश पाखरे, जो की अंधश्रद्धा निर्मूलन समितीत कार्यरत होता. त्याला फोन करून संपूर्ण घटनेची कल्पना दिली. तो पूर्ण पथकानिशी आला. त्याने सापळा रचला. मला नेहमीसारखीच वर्तणुक करण्याचे सांगितले. थोडीशीही चुक आम्हाला महागात पडणार होती.                                                

             मी मुद्दाम शेतात आज उशिरा निघालो होतो. माझ्याजवळ बँटरी होती म्हणून त्या भुताला माझा संपूर्ण ठावठिकाणा माहित पडत होता. पण त्याच्याजवळ काहीही नसल्यामुळे मला मात्र त्याचा ठावठिकाणा समजेना. तरी सुद्धा मी फक्त चालत राहिलो. त्याने वेगवेगळे आवाज काढणे सुरु केले. मी घाबरत नाही हे पाहून त्या भुताचा विरस झाला असावा. विहिरीत उतरल्यावर त्याने विहिरीकडे दगडे फेकण्यास सुरुवात केली.                                                               

                सुरेशला कॉल करून मी भुताला लवकर पकडण्याची विनंती केली. सुरेशने 2 मिनिटांत कॉल करून भुताला पकडल्याचे सांगितले. विहिरीतल्या दगडावर बँटरी मारल्यावर कालचंच 'आता माझी सटकली, मला राग येतोय' लिहिलेलं होत. त्यात काहीही बदल नव्हता. विहिरीत सुद्धा काहीच कचरा नव्हता.भुताचा पार बिमोड झाल्याची ती सुचना होती. भुताला पकडल्याच्या ठिकाणी मी गेलो. भुताच्या दोन कानाखाली वाजवल्या. ते भुत दुसरं तिसरं कुणीनसून आमचा म्हश्याच होता.                                    .               
                   अंधश्रद्धावाले त्याला पोलिसात द्यायचं म्हणू लागले. पण मीच त्यांना त्याला सोडून देण्याची विनंती केली. म्हश्याची समजूत काढल्यावर म्हश्या माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला. मला आता त्याची कीव येवू लागली. पुन्हा कधीही असा खोडसाळपणा करणार नाही ह्या अटीवर त्याला सोडून देण्यात आले.                                                                                
                  आज मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, आमचा महेश धोंडिबा पवार 'साखळी'या गावचा मागील वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अध्यक्ष आहे. ही घडलेली घटना तो अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आवर्जुन सांगतो.खरंच जगात भुत, पिशाच्च, हडळ, चकवा काहीही नसून घडलेल्या घटनेचा माणूस त्याशी संबंध जोडतो इतकेच. जर त्या दिवशी या घटनेचा पाठपुरावा केला नसता, तर माझा सुद्धा भुतांवर विश्वास बसला असता. फट्टू होऊन जर घरात बसलो असतो तर अमावस्येची भीती कायम मनात राहिली असती. भुताच्या गोष्टी मी पण 5-50 लोकांना तेल-मीठ लावून सांगितल्या असत्या. शेतातल्या विहिरीतल्या आत्महत्येची संख्या वाढवून सांगितली असती. खऱ्या अर्थाने मी फट्टूच राहिलो असतो. भुताच्या मुळाशी जावून जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर सर्व काही लक्षात येईल. या घटना एकट्याच्या सोबतच का घडतात? 4-5 लोक घोळक्यात गेल्यावर का दिसत नाही कोणी? एकतर भुत बघणाऱ्याचा तो भास असतो. नाहीतर ज्याच्यासोबत ह्या घटना घडतात ते मुळाशी जावून बघत नाहीत आणि सांगताना तीच गोष्ट अतिशोयक्ती करून सांगितली जाते.                                                           
                मला कालच म्हश्याचा कॉल आला होता. पुढच्या उन्हाळ्याचं निमंत्रण साहेबांनी आताच देऊन ठेवलयं. आम्ही परत बालपणीचीच धमाल करू, तशीच मजा करू. जमलंच तर एखादं भुत पकडू. तुमच्यापैकी कोणाला यायचंय का??

Comments

Popular posts from this blog

पैठणी दिवस भाग-४ (अंतिम).

एके दिवशी सकाळीच अंघोळ उरकून सगळे तयार झाले. इथे येऊन पंधरवाडा उलटला तरी नाथांचे दर्शन घ्यायचा योग आला नव्हता. आज कसं सगळं मस्त जुळून आलं होतं. मंदिराबाबत बोलायचं तर संत एकनाथांच्या पूर्वीच्याच वाड्याचं रूपांतर मंदिरात केलंय. नाथांचे जन्मस्थान व समाधिस्थान पैठणच. सकाळीच गेल्यामुळे काहीही गर्दी नव्हती. आरामात दर्शन झाले. पण गर्दीची व्याख्या जर कोणाला पाहायची (ऐकायची नाही बरं का) असेल त्यांनी नाथषष्ठीला (साधारणतः मार्च महिना) पैठणला जरूर भेट द्यावी. त्या दिवशी अंदाजे 5-6 लाख भाविक पैठणमध्ये हजर असतात. त्या दिवसाला 'पंचपर्व' म्हणतात. त्या दिवशी 5 प्रमुख घटना क्रमाने घडल्या आहेत खालीलप्रमाणे:- 1. नाथांचे गुरू श्री जनार्धन स्वामी यांचा जन्म. 2. स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह. 3. नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह. 4. श्री जनार्दन स्वामी पुण्यतिथी. 5. श्री एकनाथ महाराज जलसमाधी. इतक्या साऱ्या गुरू-शिष्याच्या महत्वाच्या गोष्टी एकाच दिवशी घडाव्यात म्हणजे किती तो योगायोग.           आवारातच एक 12-13 वर्षाचा मुलगा 'सत्वर पाव गे मला l भवानी आई रोड...

पैठणी दिवस भाग-२

   .                ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सरांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज.             संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला. पाणी आणि आकाश इतके बेमालूमपणे एकमेकांत गुंफले होते की, त्यांना विभिन्न करणे केवळ अशक्य.              वेळापत्रकानुसार 2 जणांना अपघात विभागात 24 तास आपल्या कामावर हजर रहावे लागे. पैकी रात्री रुग्ण आला तर मामा (वर्ग 4 कर्मचारी) खोलीवर बोलावण्यास येई. उर्वरित सर्वांना बाह्यरुग्ण विभागात (ओ. पी. डी.) 2 वेळा जावे लागे. सकाळी 10-1 आणि दु...

दत्तू किटे

        .        23 जुलै 2017 वार रविवार, रविवारी रात्री आमच्या मेस(खानावळ) बंद असायच्या. नाईलाजाने (नाईलाजाने कसलं हो ! आम्ही तर चातकासारखी वाट बघायचो रविवारची) आम्ही बाहेर जेवायला जायचो. खिसे भरलेले असले की सतत बाहेर जेवायला जाता येत. पण घरचे बरोबर दुखती नस पकडत, महिन्यात येणाऱ्या 4 रविवारी बाहेर जेवता येईल इतकाच चंदा पाठवल्या जायचा. अधात मधात बाहेर जेवायला गेलं की मित्रांकडे उधारी व्हायची. कधीना कधी द्याव्या लागणाऱ्या उधारीमुळे पुढील सगळेच दिवस तंगीत जायचे. त्यापेक्षा फक्त रविवारीच जिभेचे चोचले पुरवले जायचे. तश्या आमच्या मेस ह्या अव्वल दर्जाच्या सहकारी(co-operative) मेस होत्या. आम्ही, आमच्यासाठी, आमच्या पोटाच्या कल्याणासाठी चालवलेली खानावळ म्हणजे ह्या सहकारी मेस(लोकशाहीच्या व्याख्येच्या सुरात वाचावे. याविषयी नंतर कधी तरी). तर आठवाड्यातले 6 दिवस अगदी घरच्यासारखं जेवल्यानंतर रविवारी जीव चटपटीत खायला अगदी असुसल्या जायचा. पाऊले आपोआप ढाब्याकडे वळायची. औरंगाबाद शहरापासून 14-15 कि.मी. अंतरावर दौलताबाद रोडवर डोंगरे मामांच्या 'साईकृपा' ढाब्यावर आमची ...