Skip to main content

पैठणी दिवस भाग-४ (अंतिम).

एके दिवशी सकाळीच अंघोळ उरकून सगळे तयार झाले. इथे येऊन पंधरवाडा उलटला तरी नाथांचे दर्शन घ्यायचा योग आला नव्हता. आज कसं सगळं मस्त जुळून आलं होतं. मंदिराबाबत बोलायचं तर संत एकनाथांच्या पूर्वीच्याच वाड्याचं रूपांतर मंदिरात केलंय. नाथांचे जन्मस्थान व समाधिस्थान पैठणच. सकाळीच गेल्यामुळे काहीही गर्दी नव्हती. आरामात दर्शन झाले. पण गर्दीची व्याख्या जर कोणाला पाहायची (ऐकायची नाही बरं का) असेल त्यांनी नाथषष्ठीला (साधारणतः मार्च महिना) पैठणला जरूर भेट द्यावी. त्या दिवशी अंदाजे 5-6 लाख भाविक पैठणमध्ये हजर असतात. त्या दिवसाला 'पंचपर्व' म्हणतात. त्या दिवशी 5 प्रमुख घटना क्रमाने घडल्या आहेत खालीलप्रमाणे:-
1. नाथांचे गुरू श्री जनार्धन स्वामी यांचा जन्म.
2. स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह.
3. नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह.
4. श्री जनार्दन स्वामी पुण्यतिथी.
5. श्री एकनाथ महाराज जलसमाधी.
इतक्या साऱ्या गुरू-शिष्याच्या महत्वाच्या गोष्टी एकाच दिवशी घडाव्यात म्हणजे किती तो योगायोग. 


         आवारातच एक 12-13 वर्षाचा मुलगा 'सत्वर पाव गे मला l भवानी आई रोडगा वाहिन तुला ll' ही नाथांचीच रचना इतकी सुंदर म्हणत होता की, आपसूकच आमचे हात खिश्याकडे वळले. या गाण्यात नाथांनी सासरा म्हणजे अहंकार, सासू म्हणजे देहबुध्दी, जाऊ म्हणजे वासना, नणंद म्हणजे आशा, नणंदेचे पोर मोह आणि नवरा म्हणजे विकल्प अशी दर्शके दाखवून दिली आहेत. यात सगळ्या दुर्गुणांची आहुती देऊन संपूर्ण शरणागती पत्कारून जनार्दनांच्या ठायी एकनाथांचे सद्गुरू शरण्य सिद्ध होते. बाकी नाथांची बरीच गारुडे/अभंग/रचना गाजलेल्या आहेत. त्यापैकी मला ज्ञात असलेली दादला नको गं बाई, विंचू चावला, देवाचा देव बाई ठकडा, माझे माहेर पांढरी, रूपे सुंदर ही आहेत. तुमची यादी यापेक्षा नक्कीच मोठी असणार. नाथांच्या कार्याची आणि विचारांची अथांगता त्यांच्या साहित्यावरून नजर फिरवता नक्कीच येते. याच अथांगतेशी समरूप असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाला 'नाथसागर' हे नाव किती समर्पक वाटते. 

          गोदावरीच्या डाव्या तीरावर मंदिर आहे. नदी किनारी भरपूर फोटो काढायचे असं ठरवलं होतं, पण तीरावर जाताच मोबाईल ठेवून द्यावा लागला (घाणचं तेवढी होती हो). सगळीकडे घाणीचं साम्राज्य. आपली तीर्थक्षेत्रे इतकी....म्हणजे इतकी (तुम्हाला समजतंय ना मी कितकी म्हणतोय ते) घाण का असतात राव..😑 'स्वच्छ भारत अभियान' फक्त मोदी सरकारला आपलं वाटू नये. प्रत्येक नागरिक जेव्हा चॉकलेटच्या कागदासाठी कचराकुंडी शोधेल तेव्हा ते खरं. असो. बाकी नाथांचा पूर्वेतिहास तर आपणाला माहीत असेलच, वारी कशी सुरू झाली, एकनाथांचा रांजण, त्यांचे चमत्कार यांवर भरपूर साहित्य, चित्रपट, भारुडे झालेली आहेत. एकूणच नाथांच्या दर्शनाने प्रसन्न वाटलं.

           नाथांची भेट तर झाली होती. पण त्यांच्या आधी मराठवाड्यात अजून एक असे तेजस्वी व्यक्तिमत्व होऊन गेलंय की आपणाला जगाचे तत्वज्ञान समजण्याच्या वयात त्यांनी जगाला तत्वज्ञान शिकवलंय. या असामीने वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली (यावरूनच त्यांची श्रेष्ठता ध्यानी यावी).

         "अवघाचि संसार सुखाचा करीन ।

          आनंदे भरीन तिन्ही लोक ।।"

अवघ्या विश्वाची काळजी करणारा हा माणूस म्हणजे, ज्ञानेश्वर 'माऊली'. आपल्यापैकी लहानपणी सर्वांनीच पसायदान म्हंटलेलं आहे. किंबहुना ते अजूनही पाठ आहे.



          "जो जे वांच्छिल तो ते लाहो । प्राणिजात ।"
समस्त प्राणिजातीची मनोकामना पूर्ण करण्यासाठी ते भगवंताला विनंतीच करत असावेत. इतक्या विशाल हृदयाच्या संत जन्मभूमीला भेट देण्याची आतुरता होतीच. माऊलींच्या दर्शनाला जाण्याचा दिवस निश्चित करण्यात आला. नियोजित दिवशी सकाळीच 'श्री क्षेत्र आपेगाव' कडे आमच्या गाड्या सुटल्या.

               हे सुद्धा मंदिर गोदावरी तीरीच आहे (गोदावरी मायनं किती लेकरं अंगा-खांद्यावर खेळवलीत तिलाच माहीत). मुळ मंदिर सोडता आजूबाजूच्या मंदिरांची बांधकामे सुरू होती. मंदिरात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आदी भावंडांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या समोर एका सभामंडपात कोणा महाराजांचे प्रवचन सुरू होते. मला कधीच असल्या प्रवचनांमध्ये रस नसतो. पण दर्शन घेऊन झाले, मंदिरही पाहून झाले सर्व सहकाऱ्यांनी महाराजांमध्ये रस दाखवल्यामुळे 2 मिनिटांच्या अटीवर मीपण तेथेच सभामंडपात बसलो. महाराजांचे प्रवचन नेमकेच चालू झाले असावे असे त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते. नेमकेच त्यांनी भाविकभक्तांचे 'श्री क्षेत्र आपेगाव मध्ये सर्व माऊली भक्तांचे हार्दिक स्वागत' असे कडक स्वागत केले. 'पहिल्या शतकातील periplus of the sea या पुस्तकात नाव असलेल्या मोजक्या शहरांपैकी एक, पैठण नगरीत आपले पुनःश्च एकदा स्वागत' या वाक्याने तर मी अचंबित झालो. बाबा सुशिक्षित वाटत होता. इतका वेळ बाबांकडे दुर्लक्ष केलेला मी आता मात्र सावध होऊन ऐकू लागलो. या बाबाची शाळाच काही वेगळी होती. बाबासारखा वेष नाही, ना दाढी वाढलेली, ना काही ना काही. बाबा होण्यासाठीची कुठलीही बाह्यपात्रता यांनी पूर्ण केलेली नव्हती म्हणूनच मी त्यांना 'महाराज' म्हणून दुर्लक्षित केलं होतं (आजकालचे बाबापण ना...किती मॉडर्न झालेत, ओळखू पण येत नाहीत ☺ ). थोड्या वेळाने जर कुणी मला बाबा विषयी आपलं मत विचारलं असतं तर ते 'मला त्यांचा अनुयायी व्हायला आवडेल' असं असतं. हळूहळू बाबांनी आम्हा सर्वांच्या मनाचा ताबा घेतला. सर्व श्रोते संमोहित होऊन ऐकू लागले. प्रवचनाचा स्मृतीत असलेला आशय येथे देत आहे :-

          बाबा म्हणाले, 'पैठण....(दिर्घ विराम घेऊन)..! संत एकनाथ आणि संत ज्ञानेश्वरांच्या चरणस्पर्शाने पावण झालेली भूमी. पण इतकंच का तीच महत्त्व? तर नक्कीच नाही. महाराष्ट्रातील पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन आपण घेत आहोत याचं सर्व श्रेय जातं ते संत भानुदासांना (नाथांचे पणजोबा) अर्थात पैठणचे, भारताचे माजी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविलेले कै. शंकरराव चव्हाण ही पैठणचेच (मला आधी नांदेडचे वाटायचे). छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट ही पैठणचे. इतकंच काय शून्याचा शोध लावणारे गणितज्ञ भास्कराचार्यही पैठणचेच (हे ऐकून मात्र मी मलाच चिमटा काढून पाहिला).' बाबा खरंच कमालीचा होता.

          पुढे बाबा म्हणाले, 'शालिवाहन राजा राज्य करत असलेल्या सातवाहन साम्राज्याची ही राजधानी.' या बद्दल थोडंफार माहीत होतं पण बाबांचा व्यासंग पाहून मी थक्क झालो. एकेकाळची राजधानी आज किती खंगली होती हे गेल्या 15 दिवसांपासून साश्रू नयनांनी बघत होतो. पैठणच्या राजकारण्यांची खरंच कीव येते. कधी कधी वाटतं मी चुकीच्या काळात जन्मलो. पूर्वजांच्या काळात जन्मलो असतो तर इतिहासानेही माझ्या नावाचे एक पान नक्कीच राखून ठेवले असते. आजही इतिहास करण्याच्या संधी आहेत. पण ज्या मार्गाने जावे लागते ते नकोशे वाटतात. असो. 'पैठण हे दिगंबर जैन यांचे पण श्रद्धास्थान आहे (हे पण मला माहित नव्हतं हो 😢). यावरून बाबांचा इतर धर्मीयांविषयीचा आदर दिसत होता.पैठणच्या पर्यटनाविषयी पण बाबा भरभरून बोलले. '27 दरवाज्यांचं जायकवाडी हे जगातील पहिलं मातीचं धरण होय.' हे ही बाबांकडूनच कळलं.' ज्या पैठण नगरीत आपण गेल्या 15 दिवसांपासून राहत आहोत त्याबद्दलच आपलं ज्ञान इतकं तोकडं असेल याची जाणीव आम्हाला नव्हती. 'पैठणला दक्षिण काशी आणि गोदावरीला दक्षिण गंगा म्हणतात. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले तो नागघाटही पैठणस्थित गोदावरीतीरीच आहे.' इति बाबा.

         माय मराठी विषयी बोलताना संत ज्ञानेश्वरांच्याच रचनांचा संदर्भ देत बाबा म्हणाले,'

          "माझा मराठीची बोलू कौतुके ।
           परि अमृतातेहि पैजासी जिंके ।।"

इकडे माऊली आपल्या मातृभाषेचे गुणगान गातात आणि तिकडे आपल्या इंग्लिश माध्यमाच्या मुलांना मराठी अवघड जातं म्हणे. अरे, बाबांनो पहिले मातृभाषा शिका ना. मग परकीय भाषा शिका असं उलटं का करता. पालकच घरात इंग्रजीत बोलू, चालू, हसू (काही काही लोक हसतात बाबा इंग्रजी मध्ये☺) लागला तर अपत्या कडून काय अपेक्षा. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. आणि पालकाचे शिक्षण जर विंग्रजीत झाले असेल तर मग विषयच संपला. इंग्रजी जरी काळाची गरज असली तरी आपला काळच मराठी आहे ना (अनादिकाळापासून). भुईमुगाच्या शेंगा जमिनीखाली येतात की वर हे जर माहीत नसेल, तर काय करायचं इंग्रजीच.' बाबांचा म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होता, त्यांची इंग्रजी शिकायला ना नव्हती. पण मातृभाषा न येणं याला आक्षेप होता. ''तुम्ही एखादी चूक केल्यानंतर 'sorry' जेवढ्या सहज म्हणता तेवढ्या सहज 'मला माफ कर' नाही म्हणू शकत. वास्तविक शब्दकोशात दोघांचा अर्थ एकच. पण ताकद बघा ना, 'मला माफ कर' म्हंटल्यानंतर म्हणणाऱ्याच्या किंवा ज्याला म्हंटल त्याच्या दोघांपैकी एकाच्या डोळ्यात नकळत पाणी येणार.....ही आहे मराठीची शक्ती.' ही बाब मात्र मला शतप्रतीशत पटली (स्वानुभव). बाबांना मनोमन साष्टांग दंडवत घातले. थोड्या वेळानी बाबांनी देवचिये द्वारी, मोगरा फुलला अश्या ज्ञानेश्वरांच्या रचना सादर केल्या. काही काही गीतांचे भावार्थही सांगितले.

          "पैल तो गे काऊ कोकता हे ।"                           यातली माऊलींची विठ्ठलाच्या आगमनाची आतुरता बाबांनी आमच्या नजरे समोर उभी केली.
          "रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।"
यात मानवी मनाला भ्रमर (भुंगा) कल्पून माऊलींनी कमालच केली आहे. त्यात मनाला ते अवगुण सोडून, विठ्ठलाच्या (सद्गुण) चरणकमलावर लिन होण्याचा उपदेश देत आहेत. इतक्या लहान वयात माऊलींनी इतक्या उच्च कोटीच्या रचना कश्या केल्या असतील असा प्रश्न मला आजही पडतो. माऊलींच्या वयाचा होतो तेव्हा मला फक्त एकच रचना माहीत होती (वर्गातली☺).

    "जंववरी तंववरी वैराग्याच्या गोष्टी ।
      जंव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाहीं बाप ।।

      जंववरी तंववरी मैत्रत्व-संवाद ।
      जंव अथैसि संबंध पडिला नाहीं बाप ।। 

      जंववरी तंववरी युद्धाची मात ।
      जंव परमाईचा पूत देखिला नाहीं बाप ।।"

याच्या भावार्थने तर मी खरंच भारावलो. तो असा, पुष्कळ माणसे वैराग्याच्या गोष्टी बोलत असतात पण हे कुठपर्यंत तर सुंदर नारी दिसे पर्यंत. काही लोक मैत्रीच्या गोष्टी करतात पण, पैशाचा संबंध आला की काढता पाय घेतात. जोपर्यंत शत्रू दिसत नाही तोपर्यंत युद्धाच्या आरोळ्या ठोकणारेही भरपूर असतात. आजही ह्या गोष्टी किती तंतोतंत लागू होतात. या रचनेवरून माऊलींचे व्यवहारी ज्ञान किती सूक्ष्म आणि अचूक होते याचा ढोबळ अंदाज येतो.

        थोडा विषय बदलावा म्हणून बाबा म्हणाले, ''मी तुम्हाला आता पैठण नगरीची आख्यायिका सांगतो.'' आम्ही आता सगळे कान टवकारून ऐकू लागलो.  "बहलिक प्रदेशाचा राजा इल शिकार करत असताना त्याने चुकून शिवाच्या प्रदेशात प्रवेश केला. शिवाला त्याचा राग आला. शिवाने त्याला शाप दिला की, 'तु इथून पुढील आयुष्य स्त्री म्हणून जगशील.' त्याने पार्वतीची अथक प्रार्थना करून तिला प्रसन्न केले. तिच्याकडून त्याने शापामध्ये थोडी सैलता मागितली. त्यानुसार त्याला एका महिन्यात स्त्री तर दुसऱ्या महिन्यात पुरुष म्हणून जगायचे होते. 'दगडापेक्षा  विट मऊ' म्हणून बिचाऱ्याला तसेच राहावे लागणार होते. पण एका महिन्याचे त्याला पुढच्या महिन्यात काहीच आठवत ही नव्हते. महिलेच्या अवस्थेत असताना त्याने नवग्रहांपैकी एक असणाऱ्या बुधाशी लग्न केले. नंतर बुधाने अश्वमेध यज्ञाद्वारे शिवाला प्रसन्न करून इल ला शापमुक्त केले. याच इलने समोर जाऊन प्रतिष्ठानपूर नावाच्या शहराची स्थापना केली. प्रतिष्ठानपूर दुसरं-तिसरं कुणी नसून आपलं पैठण आहे." प्रतिष्ठानपूर म्हणजे आपलं पैठण हे ऐकून उपस्थितांनी एकच हर्षोद्गार काढले. सर्वांना आनंद झाला. अश्या एक न अनेक गोष्टी बाबांनी आम्हाला सांगितल्या पण माझ्या अल्पमतीला त्या लक्षात राहतील तरच नवल. संध्याकाळ झाल्यामुळे प्रवचन अर्धे सोडून आम्हाला निघावं लागलं. बाबांनी इतकं मंत्रमुग्ध करून टाकलं होतं की त्या धुंदीत त्यांचं नावही दुसऱ्या कुणाला विचारण्याची आठवण राहिली नाही.इतर प्रवचनकार अध्यात्माविषयी, देव-देवतांविषयी जास्त बोलतात पण या बाबांचा पिंड काही और होता. सर्व क्षेत्रात त्यांनी चौफेर फटकेबाजी केली होती. जीवनात लक्षात राहतील अशी काही पात्रे येतात, त्यांपैकीच हे एक अनाम पात्र. 

          पर्यटकांच्या आघाडीची पसंती असलेले पर्यटन स्थळ म्हणजे 'संत ज्ञानेश्वर उद्यान' हे उद्यान म्हैसूर च्या 'वृंदावन गार्डन'हून प्रेरित होऊन तयार झालेले आहे. लहानपणी इथे आलो होतो पण फक्त आलो होतो इतकंच आठवत इतका लहान होतो. :)  थोडीफार कारंजे आठवत होते म्हणा पण जास्त काही नाही. त्यामुळे उत्सुकता होतीच. उद्यानाला कारंजे बघता यावे म्हणून संध्याकाळी भेट देण्यात आली. चहूकडे हिरवळ आणि भव्य परिसराने मन प्रफुल्लीत झाले.आपल्याला कुठलीही गोष्ट नीट सांभाळता का येत नाही किंवा खराब झालेली वस्तू वेळीच बदलता का येत नाही हे समजत नाही. उद्यानातले मोजके कारंजे सोडता सगळे बंद होते. जे सुरू होते ते लवकरच बंद पडतील असा मला विश्वास आहे. किंबहुना तेथील पदाधिकारी ते बंद पडण्याचीच वाट बघत असावेत अशी अवस्था तेथे होती. विद्युतरोषणाई पाहिजे तशी नव्हती. नावाला भकभक फोकस उभारलेले होते. आपेगावच्या संत भावंडांच्या पुतळ्याची अवस्था बघवत नव्हती. कुणाचा हात तुटलेला,कुणाच्या पायाची बोटं, कुणाचे वस्त्र फाटलेले. संपूर्ण उद्यानाची रया गेलेली होती. प्रवेश शुल्क घेतले जाते. मग का नाही होत या दुर्दशेवर मात. कोणत्या निधीची वाट बघतात ही लोक. इतका समृद्ध वारसा का नाही टिकवू शकत आपण. महाराष्ट्रातल्या इतरही पर्यटन स्थळांची अवस्था या पेक्षा वेगळी नाही आहे. सगळे मूर्च्छित अवस्थेत आहेत. उद्यानात एक कोपऱ्यात एका कुत्रीने पिल्लांना जन्म दिला होता. एकदम आक्रमक अवस्थेत ती होती. भरपूर कुत्री झालीत उद्यानात. वेगळा मतदारसंघ मागतील काही दिवसात असाच जन्मदर राहिला तर. सकाळी काही लोक फिरायला येतात उद्यानात तर त्यांपैकी कैक जणांना श्वानोबांनी आपला इंगा दाखवलाच आहे. या घटनांमुळे पर्यटन स्थळांचा वाईट प्रचार होऊन पर्यटक संख्या रोडावते. आतमधील पुराणवस्तु संग्रहालय पाहण्यासारखे आहे. त्या काळचे चलन, अवजारे, हत्यारे, शिवकालीन पत्रे, सातवाहन साम्राज्याचा नकाशा आणि माहिती सुद्धा इ.इ. उद्यानाच्या बाहेर जाताना गेटवरच साप दिसला. बिनविषारी असल्यामुळे लगेचच त्याला सेलेब्रिटी बनवून सोडून देण्यात आलं. राहत्या ठिकाणी येई पर्यंत अजून 2 साप दिसले, पण ते विषारी असल्यामुळे आमची वाट आम्ही सोडली नाही. दूरदर्शन करून मुक्कामी आलो.☺

        जाता-जाता एक गोष्ट जरूर सांगेन, पैठणला गेलेच तर शौकत भाईची चिकन बिर्याणी जरूर खा. ज्या गोष्टींनी आम्हाला आनंद दिला, त्यापैकी एक म्हणजे शौकत भाईची बिर्याणी. यांच्याशी पण भरपूर सूत जुळलं होतं. संध्याकाळी 6 ला कॉल करून ऑर्डर देऊन ठेवायची. 8 पर्यंत तुम्ही आनंद घ्यायला मोकळे. बिर्याणी घ्यायला गेले की एक प्लेट कंटकी जरूर खा. ती पण छान बनवतात. एक छोटासा गाडा आहे त्यांचा पण हाताची सर मोठाल्या हॉटेलांना पण नाही. शेवटची बिर्याणी नेली तेव्हा शौकत भाई म्हणाले, 'सर ये 2016 का नवम्बर मेरे लिये बहुत खास है।' आम्ही विचारलं , 'क्यू?' तर म्हणे, ' मैं 25 साल से बिर्याणी बनाता हूं। लेकिन आप जितने दर्दी लोग नहीं देखे। ये महिने मे आपकी वजह से मेरा धंदा दुगना हुआ है।' संधी मिळेल तिथे शौकत भाईची जाहिरात तर केलीच होती. संपूर्ण महिन्यात कमीत कमी 4000रु.ची बिर्याणी खाऊन झाली होती.

              शौकत भाईंच्या बिर्याणीची एक झलक

         जस जसे पैठणी दिवस उत्तरार्धात सरकले, तसे रोज सकाळी उठलं की वाटायचं आता 4-5 दिवसच राहिले यार ..! अशी रोज सकाळी उठून हळहळ व्यक्त व्हायची. मला अजूनही शेवटची रात्र आठवते. ज्या रात्री आम्हापैकी कुणाचाच डोळ्याला डोळा लागला नाही. सगळे जागी असून बोलत मात्र कुणीच नव्हतं. जशी कुणाची मयतसभा असावी. आदल्या संध्याकाळी धरणावर जाऊन सर्व नजारा नजरेत साठवण्याचा प्रयत्न केला पण, उद्या जायचंय ही रुखरुख काही कमी होत नव्हती. सर्व क्षणचित्रे गोळा करण्यासाठी मन धडपडत होते. बुद्धी मात्र 'हे सर्व क्षणिक असतं रे' म्हणून साथ देत नव्हती. धरणावर असताना इतकं भकास, भंपक कधीच वाटलं नव्हतं. सूर्यदेवाने लवकरच काढता पाय घेतला. नेहमीसारख्या लाटाही नव्हत्या. नाथसागरही आपली उदासीनता दाखवत होता. रोज पुष्कळ दिसणारे खेकडे आज मात्र जाणूनबुजून वर आले नसावेत. धारणावरचा गार वारा नावालाच होता, धरणाच्या भिंतीचे मोठाले खडक अजूनच निर्जीव भासत होते. काळ खरंच सर्वश्रेष्ठ आहे. हे तो वेळोवेळी दाखवून देतो. येथून गेल्यानंतर सर्वांची दिनचर्या परत घाणीतल्या बैलासारखी एका खांबाभोवती घिरट्या घालणार होती. समोर ध्येयाचे असंख्य रस्ते दिसत होते. आयुष्याच्या वळणावरती भेटलेल्या विसाव्याचे क्षण आता संपले होते.

                       ----------*----------

        पैठणहून येऊन आता 4-5 महिने झाले होते. त्या आठवणींच्या विखाऱ्याला रोज फुंकर घालून सर्वजण आपापल्या परीने धगधगत ठेवत होते. एके दिवशी इरफान भाई आणि आमची अचानक भेट झाली. सर्वांना आनंद झाला. आता रुग्णवाहिका सुरू झाल्याचे समजले. साधनांच्या अभावामुळे पैठणहून रेफर केलेले रुग्ण, रुग्णवाहिकेतून औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नियमित घेऊन येतात. तेव्हा नियमित आमची भेट होते. हृदयात पैठणी दिवसांचा भला मोठा कप्पा तयार झालाय. 
         परलोकांत गेल्यानंतर चित्रगुप्ताने जर मला काही दिवस आवडीचे क्षण परत जगण्याची संधी दिली तर त्यात हे "पैठणी दिवस" नक्की असतील.

काही क्षणचित्रे

               रोज रात्री खुलणारा जुगाऱ्यांचा अड्डा.


      उद्यान ते पुरातन संग्रहालय यांना जोडणारा पूल.

                             अप्रतिम नजरा

                        ओळखा पाहू? काय ते.

                               मर्कट लिला.


                       सलाईन लावताना लाला.

रात्रपाळी करून दमलेल्या चेहऱ्यांना हसवताना खूप प्रयास पडतात.

उद्यानातील एक निवांत क्षण.

                           खतरों के खिलाडी

 जायकवाडीत सगळं आल-बेल तर आहे ना याची शहानिशा करताना डीन सर.


     या हिरोने आईच्या पोटातून बाहेर यायला अख्खी रात्र जागवलं आम्हाला.



       बाह्यरुग्ण विभागात तपासणी करताना लाला.    

                हे बगळोबा काय शोधत असतील बरं?


                             धन्यवाद...!

समाप्त.

Comments

  1. Awesome writing skills
    I think you should take writing as a profession
    You'll definitely out do some big names
    And really thanks a lot for making me famous
    Best of luck for future ventures...
    @ sachin awasarmol

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर..तुम्ही खूप तरुण डॉक्टरांसाठी प्रेरणादायी काम करत आहात. यात खंड पडणार नाही याची खात्री आहेच. आपण प्रतिक्रिया दिलीत हीच माझ्यासाठी खूप मोठी पोच -पावती आहे.😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

दत्तू किटे

        .        23 जुलै 2017 वार रविवार, रविवारी रात्री आमच्या मेस(खानावळ) बंद असायच्या. नाईलाजाने (नाईलाजाने कसलं हो ! आम्ही तर चातकासारखी वाट बघायचो रविवारची) आम्ही बाहेर जेवायला जायचो. खिसे भरलेले असले की सतत बाहेर जेवायला जाता येत. पण घरचे बरोबर दुखती नस पकडत, महिन्यात येणाऱ्या 4 रविवारी बाहेर जेवता येईल इतकाच चंदा पाठवल्या जायचा. अधात मधात बाहेर जेवायला गेलं की मित्रांकडे उधारी व्हायची. कधीना कधी द्याव्या लागणाऱ्या उधारीमुळे पुढील सगळेच दिवस तंगीत जायचे. त्यापेक्षा फक्त रविवारीच जिभेचे चोचले पुरवले जायचे. तश्या आमच्या मेस ह्या अव्वल दर्जाच्या सहकारी(co-operative) मेस होत्या. आम्ही, आमच्यासाठी, आमच्या पोटाच्या कल्याणासाठी चालवलेली खानावळ म्हणजे ह्या सहकारी मेस(लोकशाहीच्या व्याख्येच्या सुरात वाचावे. याविषयी नंतर कधी तरी). तर आठवाड्यातले 6 दिवस अगदी घरच्यासारखं जेवल्यानंतर रविवारी जीव चटपटीत खायला अगदी असुसल्या जायचा. पाऊले आपोआप ढाब्याकडे वळायची. औरंगाबाद शहरापासून 14-15 कि.मी. अंतरावर दौलताबाद रोडवर डोंगरे मामांच्या 'साईकृपा' ढाब्यावर आमची मैफिल रंगायची. नेहमीचे सदस्य म्

जैविक व रासायनिक ब्रम्हास्त्रे भाग-१.

       .             ऑगस्ट 1906 साल अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्य. ऑईस्टर बे या नासाऊ प्रांतातील शहरात एका आलिशान घरात एक मुलगी आजारी होती. त्या काळात अमेरिका आता इतकी जरी पुढारलेली, प्रगत, आत्ममग्न नसली तरी त्या मुलीच्या आजारपणाशी बाकीच्यांचा संबंध येण्याचे वा इतका गवगवा होण्याचं काही एक कारण नव्हतं. ज्या घरात ती आजारी होती ते घर नेहमी पर्यटकांसाठी भाड्याने दिल्या जात असे. अश्याच पर्यटकांपैकी ती सुद्धा तिच्या परिवारासमवेत येथे सुट्ट्यांचा आनंद लुटायला आली होती. घर प्रशस्त आणि समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे कोणत्याही पर्यटकास चटकन पसंत पडे. पण ऐनवेळी आजारी पडल्यामुळे सगळा खेळखंडोबा झाला होता. इतर सदस्य तिची सर्वतोपरी काळजी घेत होते. पण तरी तिचा ताप काही केल्या उतरेना. लक्षण टायफॉईडची (विषमज्वर)असल्याचे बोलले जात होते. कारण इतरत्र टायफॉईडचे रुग्ण आढळले होते. वर्तमानपत्रातही टायफॉईडच्याच बातम्या येत होत्या. साथच असावी बहुदा. म्हणून रोगाच्या निदानाची घरातल्या लोकांनाच चटकन कल्पना आली. पण दुर्दैवाने घरातील इतरही 6 सदस्य लवकर आजारी पडले. अगदी त्याच लक्षणांसहित. आता मात्र बाब गंभीर होती. घरातील

पैठणी दिवस भाग-२

   .                ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सरांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज.             संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला. पाणी आणि आकाश इतके बेमालूमपणे एकमेकांत गुंफले होते की, त्यांना विभिन्न करणे केवळ अशक्य.              वेळापत्रकानुसार 2 जणांना अपघात विभागात 24 तास आपल्या कामावर हजर रहावे लागे. पैकी रात्री रुग्ण आला तर मामा (वर्ग 4 कर्मचारी) खोलीवर बोलावण्यास येई. उर्वरित सर्वांना बाह्यरुग्ण विभागात (ओ. पी. डी.) 2 वेळा जावे लागे. सकाळी 10-1 आणि दुपारी 2-4 हे कामाचे तास सोडले तर इतरवेळी तुम्ही काहीही करू शकत होतात. कामाच्या वेळी सुद्धा आम्ही बरीच दिरंगाई केली