Skip to main content

पैठणी दिवस भाग-३

.
  बाह्यरुग्ण विभागामध्ये मलमपट्टी विभागात काम करायला मला विशेष आवडत असे. रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता येत असत. 'जखम कशी झाली' या विषयाद्वारे रुग्ण आपलं मन माझ्यापाशी मोकळं करत. त्यांच्याकडून मग मी पैठण शहराची माहिती, प्रेक्षणीय स्थळे, खाऊ गल्ली यांची माहिती अलगद काढून घेत असे.
                   
                     असेच एके दिवशी मध्यम वयाचे गृहस्थ आपल्या वडिलांना घेऊन मलमपट्टी विभागात आले. दोघेही एकमेकांवर मारवाडी भाषेत ओरडत आले. वडील मुलाला म्हणत होते, 'मला नाही करायची पट्टी बिट्टी'. त्यांचा मुलगा पण त्यांना प्रतिउत्तर देत होता. आत आल्यानंतर मात्र ते शांत झाले. त्यांना पायाला मोठी जखम (ulcer) झालेली होती. ती खूप खूप दिवसांपासून बरी होत नव्हती. अर्थात काळजी घेण्यात दिरंगाई होत होती. जखम भरत नाही म्हणजे आहार पण निकृष्टच असावा. जखमेचा भाग काळसर पडत चालला होता. त्यात भरपूर घाण साठली होती. त्यांची जखम व्यवस्थित साफ करून मलमपट्टी केली. पण खरा इलाज अजून बाकीच होता (सुसंवाद). बाप लेकामध्ये सुसंवाद नाही हे लक्षात आले होते. आजोबा चिडचिड करत होते. त्यांना शांत करणं आवश्यक होतं. त्यांना अगदी मृदू आवाजात बोलण्याचे पूर्ण कसब पणाला लावून बोलण्यास सुरुवात केली, 'आजोबा आपल्या शरीराची  काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. त्या जखमेला तुम्ही बरी होत नाही म्हणून दुर्लक्षित करू नका. तिची लहान लेकरासारखी काळजी घ्या. ती आपोआप बरी होईल.' त्यांच्या मुलाला पण सांगितलं की, 'तुम्हाला पण त्यांची बरीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. काळजी घेण्यात जर निष्कळजीपणा झाला तर त्यांचा पाय कापावा लागेल. मग ते परावलंबी होतील आणि सगळं तुम्हालाच करावं लागेल.' या बोलण्याचे सकारात्मक बदल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. पुढे त्यांना सांगितले, 'त्यांचा आहार प्रथिनेयुक्त करा. ते आजारी असल्यामुळे चिडचिड करत असतील पण तुम्ही त्यांवर खेकसू नका. तुम्ही त्यांना दर 2-3 दिवसाला पट्टी बदलण्यासाठी घेऊन येत चला. मी तुम्हाला खात्रीने सांगतो जर या गोष्टींचे पालन तुम्ही कसोशीने केलंत तर एक महिन्यात तुमच्या वडिलांची जखम भरून येईल.' त्यांना विश्वास बसत नव्हता. पण सांगितल्याप्रमाणे त्यांनी सर्व काळजी घेतली. पैठण सोडण्याच्या आदल्या दिवशी मी त्यांची शेवटची पट्टी बदलली. तेव्हा आजोबांनी मला भरभरून आशिर्वाद दिला. जखम आता भरल्यातच जमा होती. त्यावेळी मला प्रचंड समाधानी वाटलं. सुसंवादाने रुग्णाचे अर्धे दुखणे कसे पळून जाते ते समजले. समाजातील डॉक्टरचे स्थान काय या प्रश्नाचे उत्तरही कळाले. :)

                   संध्याकाळी 5 च्या दरम्यान दुपारच्या सत्राची ओ.पी.डी. संपल्यानंतर आम्ही मोकळे असू. या वेळेमध्ये आम्ही फुटबॉल, क्रिकेट खेळत असू. फुटबॉल मध्ये अल्लू, शुभी, बडे भाई पारंगत होते तर क्रिकेट मध्ये सुरज आणि माझ्या नादाला कुणी लागत नव्हते. ;) त्या वेळी आमचे क्रिकेट चे सामने रंगत. रुग्णालयाचे कर्मचारी त्यात (डॉ.सचिन, डॉ.दिपक आणि ब्रदर्स) विरुद्ध इंटर्न (म्हणजे आम्ही). त्यात कोण जिंकत असेल हे वेगळे सांगायला नकोच. त्यांकडे अमोल ब्रदर ची गोलंदाजी वाखाणण्याजोगी होती. वेग भरपूर असल्यामुळे बॅटच्या मधोमध बॉल बसला की सीमारेषेच्या बाहेर. आमच्याकडे पण 'दर्जा' गोलंदाज होता, सुरज. भाऊचा बॉल फलंदाजांची बॅट सोडून सगळीकडे लागे. फलंदाजाच्या अंगा-खांद्यावर, छातीवर कुठेही भाऊ आपली छाप सोडून जात. पण कहर तेव्हा होई, जब कोई गेंद जाके दों टांगों के बीच में लगे. :) फलंदाजीत त्यांच्याकडे इरफान भाई तर आमच्याकडून 'बाजीराव' (मीच हो).

                   संध्याकाळच्या वेळी मस्त रमत-गमत, गप्पा मारत आम्ही धरणावर जात असू. धरणाच्या पायथ्याशी खाण्याचे भरपूर पदार्थ आहेत पण आम्हाला भावली ती तेथील भेळ. जेव्हापासून आम्हाला त्या भेळचा शोध लागला, तेव्हापासून बाकीच्या दुकानांकडे जाण्याची इच्छाच झाली नाही. असेच एके दिवशी धरणाकडे जात असता, वाटेतच गर्दी दिसली. समोर जाताच कळाले की कुणा मराठी चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. आम्ही पाहिलेले दृश्य मारामारीचे होते. अभिनेत्याची शरीरयष्टी मात्र खूप मजबूत होती. अशा शरीरयष्टीचा अभिनेता आज पर्यंत मी तरी मराठी चित्रपटात पाहिला नाही. चित्रपटाचे नाव 'दंडम' दिग्दर्शकाचे पी. मंजुळे आणि अभिनेत्याचे 'आर्यन जाधव' असे तेथील सुरक्षारक्षकाने सांगितले. खरे काय ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच.


                          भेळ खाताना चौकडी

                 रविवारी बाह्यरुग्ण विभाग बंद असल्यामुळे आम्ही दिवसभर मोकळेच होतो. सकाळीच धरणावर जाऊन मस्त फोटोशूट करण्याचे ठरले. एक दोन फोटो काढले नाही तो माझा पाय शेवाळलेल्या खडकावर पडला. सटकन सटकून पटकन पाण्याखाली आलो, मोबाईल सहित. :) अशा वेळी काहीही होऊ शकत. पोहणं जरी येत असले तरी अपघातच तो. भरपूर पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही जलसमाधी मिळालेली आपण ऐकलीच असेल. एक सेल्फी मला 9000 रु. ना पडली. मी सुखरूप बाहेर आलो पण मोबाईलने मात्र जीव सोडला होता. त्या नंतर तो सुरूच झाला नाही. :( रात्री मित्राच्या मोबाईलवरून घरी मोबाईल खराब झाल्याचे सांगताच पलीकडून फायरिंग सुरू झाली. 'तुला कुठलीच वस्तू सांभाळत येत नाही, पैसे काय झाडाला लागले काय?इ.इ. पाण्यात पडला हे कळताच फायरिंग ची जागा बॉम्ब ने घेतली. कारण आधीचा पण एक मोबाईल पाण्यात पडून खराब झाला होता. 'अगं आई पाय घसरून मोबाईलसहित मी धरणात पडलो.' समोरून आवाज आला नाही. युद्ध बंदी झालेली होती. क्षणिक शांततेनंतर आवाज आला, 'तू व्यवस्थित आहेस ना.'

              एके दिवशी आम्हाला मासे पकडण्याची हुक्की आली. आम्ही पाण्याच्या बाटलीपासून एक फिश ट्रॅप बनवला. आमिष म्हणून त्यात पोळीचे तुकडे टाकले आणि सायंकाळी चांगला अंधार पडल्यावर तो लावून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिल्यावर त्यात 4 झिंगे अडकलेले होते. :) 'जल की रानी' मात्र आमच्या आमिषाला बळी पडली नव्हती. नाल्यातल्या, नदीतल्या खेकड्यांपेक्षा धारणातले खेकडे जास्त चपळ वाटले. त्यांना लपायलाही जास्त जागा असते. संध्याकाळी धरणावर आल्यावर सुरज आणि मी खेकडे पकडण्याचा प्रयत्न करत असू. भरपूर दिवस तो आम्हाला पकडताच आला नाही. सुरज त्याला काठीने वरून दाबून धरणार, मग मी त्याला पकडणार अशी आमची नामी योजना होती. पण ते इतके चपळ होते की, पाण्यात काठी जाताच दोन दगडामधल्या फटीत गायब होत. एकदा गायब झाले की मग बाहेर येत नसत. एके दिवशी इरफान भाईला घेऊन गेलो सोबत खेकडे पकडायला. भरपूर फिरलो पण हाती लागेचना काही. इरफान भाईला इतकं जबरदस्त फिरवलं की नंतर नंतर, ' इरफान भाई चलो खेकडे पकडनेको' म्हंटल की 'पठाण' गायब झाले म्हणून समजा. :) थोड्या दिवसांनी आमच्या हातात घबाड लागलं. तळहाताएवढा खेकडा किनाऱ्यावर होता. तो पाण्यात नसल्यामुळे आमच्या हद्दीत होता. मग त्याला आरामशीर पकडला. आमची सगळी बच्चे कंपनी खूष झाली. वेगवेगळ्या अंगाने सेल्फीज् घेऊन त्याला सेलेब्रिटी बनवण्यात आले. सगळं झाल्यावर हळूच पाण्यात सोडून देण्यात आले.

                         खेकड्यासोबत बडे भाई.


           'दिल चाहता है' ची नक्कल करताना सुमीत.

                धारणावरून खाली उतरल्यानंतर जर काही कारणास्तव परत चढण्याची वेळ आली तर अंगावर काटाच येत असे. दुर्दैवाने अशी वेळ लालावर आली. त्याची टोपी धारणावरच विसरली. त्याने शुभमला म्हंटले की, 'बॅग मध्ये आहे का बघ.' न बघताच शुभम म्हंटला 'नाही ती धारणावरच राहिलीये.' नाईलाजाने लालाला जावे लागले. तो खाली उतरत असताना त्याजवळ काही टोपी नव्हती. म्हंटल 'गेली आता चोरीला.' त्याने खाली येताच शुभमच्या पाठीवरची बॅग घेतली आणि त्यात पाहिलं तर टोपी होती. त्यावेळी लालाचा तांडव बघण्यासारखा होता. नशीब आमचं त्याने 'तिसरा डोळा' उघडला नाही. :)

            इरफान भाई रोज सकाळी जायकवाडीवर पोहायला जात. एके दिवशी सुरज आणि मी त्यांना म्हंटल की, 'आम्हीपण येतो पोहायला' तर हा माणूस चक्क नाही म्हणे हो. म्हणे, 'सरजी, कमर तक पानी नही रहता, बहुत गहरा रहता है ।' मी म्हंटल, 'अरे इरफान भाई, आम्हाला येत हो पोहणं. पोहणं आल्यावर पाणी किती खोल आहे याला काय महत्व.' तर म्हणे, 'सरजी ये डॉक्टर लोगोंका खेल नहीं है।' मी म्हंटल, 'चलो यार तुम, मी पोहून दाखवतो आज, तुमको पिछे छोड दूनगा मैं।' गडगडाटी हसत प्रतिउत्तर आले, 'सर मान लेता हू तुम्हे तैरना आता है, लेकिन इसका मतलब ये नहीं ना की तुम 'पठाण' को हरा सकते हो।' जुगलबंदीतला अंतिम डाव टाकत मी उत्तरलो, 'बाजीराव के तैरने पे कभी संदेह नहीं करते।' ;) कल घोडा और मैदान नजदीक होंगे।' मला एक गोष्ट समजत नाही. आम्हा डॉक्टरांना इतर लोक इतके नाजूक का समजतात राव..! गावाकडे क्रिकेट खेळायला गेल्यावर तेथील गोलंदाज विचारतात, 'हळू टाकू का बॉल.' मी शांततेत म्हणत असतो, 'तू कसाही टाक तुला छक्काच मारतो.' मग कुठे तो चिडून जोरात बॉल टाकतो असो.


              ठरल्याप्रमाणे आम्हाला इतक्या दूरवर पोहत जायचं होतं की तेथून मागे वळून पाहता मंदिराचा कळस दिसला पाहिजे. ज्याला तो पहिले दिसेल तो जिंकला. सकाळीच सगळी फौज काठावर हजर होती. दोघेही तयार होतो. इरफान भाईला तेथील खडकाचा चांगला अंदाज असल्यामुळे त्यांनी सुरेख सूर मारला. मी मात्र हळूहळू एक एक खडकावर पाय ठेवत पाण्यात उतरलो. पहिलेच 9000रु. चा चुना लागला होता. आता अजून कोणतंच नुकसान परवडणारं नव्हतं. मी उतरेपर्यंत इरफान भाई 6-7 फूट लांबीचा सूर मारून नुकतेच पाण्याबाहेर आले होते. मागे वळून ते म्हणाले, 'क्या सर अभीच पिछे गिरे तुम तो.' मी म्हंटल, 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.' आता मी पण चांगला वेग पकडला होता. लहानपणापासून पोहत असल्यामुळे पूर्ण विश्वास होताच. मी आता पॉवरफुल स्ट्रोक मारण्यास सुरुवात केली. धरणाची भिंत खूप उंच होती आणि त्यापलीकडील मंदिराचा कळस पाहणे म्हणजे खरंच साधं-सुध काम नव्हतं. अंतरही भरपूर होते. आता मात्र इरफान भाई पाठीवर उलटं पोहायला लागले. मला समजलं भाई थकलेत. जेव्हा मला मंदिराचा कळस दिसला तेव्हा इरफान भाई 6-7 फूट मागे हात जोडून उभे होते. मी शर्यत जिंकलो होतो. दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद कसा शोधायचा ते इरफान भाई कडून शिकलं पाहिजे. काठावरील सर्व सहकारी हळूहळू पाण्यात उतरले. सर्व मस्त पाण्यात खेळले. बऱ्याच जणांना थोडा सराव केल्यावर आपल्यालाही पोहता येऊ शकत याचा साक्षात्कार झाला. नंतर वीज प्रकल्पाला भेट देण्याचा मानस होता, पण तेथे जाण्यासाठी आपल्या वरिष्ठांची लेखी परवानगी लागते हे समजल्यावर त्या प्रस्तावाला कचराकुंडी दाखवण्यात आली.


            सहकाऱ्यांसमवेत मनसोक्त आनंद लुटताना.


               संध्याकाळी धारणावरून परतताना आम्ही जळतन गोळा करत असू. थंडीचे दिवस असल्यामुळे रात्री मस्त शेकोटीचा कार्यक्रम असे. रुग्णालयाच्या आजूबाजूला झाडी बरीच होती आणि धरण जवळ असल्यामुळे जाम थंडी पडत असे. अशा थंडीत शेकोटी म्हणजे आहाहा...! प्रत्येकाच्या योगदानामुळे भरपूर मोठे जळतन जमा होई. मग रात्री जेवण उरकल्यावर गोलाकार बसून सगळे शेक घेत असत. उपस्थित असणारे सगळे कर्मचारी (ब्रदर, सिस्टर, मामा, इरफान भाई, अक्षय भाऊ इ.) मैफिलीत सामिल होत. तेथे रंगणाऱ्या गप्पा-गोष्टी याला तोडच नव्हती (विशेषतः भुताच्या, आत्महत्येच्या, खुनाच्या इ.) अंताक्षरी म्हंटली की सुरज ज्या ग्रुप कडून असणार तो ग्रुप जिंकणार हे ठरलेलंच होत. या माणसाकडे गाण्यांचा प्रचंड खजिना आहे अन त्याशी स्पर्धा करणे म्हणजे 'कुठे तो इंद्राचा ऐरावत, अन कुठे शामभट्टाची तट्टाणी.' आम्ही आणलेलं जळतन संपलं की मग गायकवाड मामाच जळतन बाहेर निघे. त्यांनी ते बिघडलेल्या रुग्णवाहिकेत साठवून ठेवलेलं होत.

पार्टीसाठी आलेल्या कनिष्ठ (ज्युनिअर) सोबत काही मौलिक क्षण.

             कुठून तरी फिरून आलो होतो. सर्वजण थकल्यामुळे पटापट झोपी गेले. मी व लाला बराच वेळ शेकत होतो. गायकवाड मामांच्या गप्पा ऐकत असताना आल्हाददायक वाटत होते. थोड्या वेळाने 2 सिस्टर्स हो येऊन बसल्या. मामा म्हणे, 'स्त्रीभ्रुण हत्या किंवा हुंडाबळी यास कोण जबाबदार, म्हणजे स्त्री की पुरुष.' म्हंटल, 'अस एकला दोषी थोडी ठरवता येणार मामा.' तर ते म्हणाले की तुम्हाला एकच सांगायचंय स्त्री किंवा पुरुष.' सिस्टर तात्काळ उतरल्या 'पुरुष.' झालं ना राव मग काय त्यांनी सीमोल्लंघन केल्यामुळे आम्हीपण बॉम्बफेक सुरू केली.मस्त वादविवाद रंगला. त्या प्रसंगाची आठवण येताच आम्ही कितीही तणावात असलो तरी आजही आमच्या चेहऱ्यावर हास्यलकेर उमटते. :)

                पैठणमध्ये आल्यानंतर आम्हाला सर्वाधिक आकर्षण होत ते 'मन्नू' ढाब्याच. तो ढाबा पैठण-शेवगाव रोडवर आहे. पूर्ण महिनाभरात आम्ही तीनदाच गेलो. पैठण पासून भरपूर अंतरावर असल्यामुळे आणि रुग्णालयातून सर्वांना एकदाच सुट्टी मिळत नसल्यामुळे जास्त जाणे झाले नाही. पण जेवढ्या वेळी गेलो, जिभेचे भरपूर चोचले पुरवल्या गेले. तेथील खेकडा फ्राय, बाम करी ह्या डिशेस विशेष घर करून गेल्या. दुचाकीवर जाताना लवकर जाऊन यावे लागते. लुटमारीला वाव आहे. रस्ता खराब असून ओसाड आहे. रस्त्याच्या दुतर्फा विटभट्ट्या आहेत. आम्ही सगळे सोबत जात असल्यामुळे काही धोका जाणवला नाही.
                      जगप्रसिद्ध😉 'मन्नू' ढाबा.

                रुग्णालयासमोरच महाराष्ट्र शासन अधिकृत 'पैठणी कला केंद्र' आहे. तेथे पैठणी कशा विणतात ते बघता पण येत. दुर्दैवाने कामगारांची जेवणाची सुट्टी झाल्यामुळे आम्हास ते बघता आले नाही. जवळच असल्यामुळे कधीही जाऊन येऊ या भ्रमात आम्ही राहिलो नंतर कधी योगच आला नाही. बाकी तेथील पैठणी फार सुंदर आहेत. मला त्यातलं काही विशेष कळत नव्हतं पण त्यावरची कलाकुसर खरंच मनमोहक होती. 20 हजारांपासून ते 2-4 लाखपर्यंतच्या पैठणी आम्ही बघितल्या. ऑर्डर दिल्यापासून पैठणी आपल्या हातात येई पर्यंत किमान 3-4 महिन्यांचा कालावधी लागतो. यावरून त्यांच्या मेहनतीचा अंदाज यावा..याचीच ती किंमत. :)

क्रमशः

Comments

  1. Ekdam mast Saurabh ... .Mannu dhabyachi athavan Ali....

    ReplyDelete
  2. हो सर....जाऊ कधी तरी सोबत (मेस पार्टी☺)

    ReplyDelete
  3. * Great interaction between doctor(you) & patient due to good doc:patient ratio... more youth should move toward medical field to serve our people better.
    * Emotional & optimisti talk with patient is most require more than just treatment
    * When you used to play cricket, you must had spread need of playing or exercise among patient for healthy life
    * In critical situation we must use emotional power to handle situation(eg. dear mom, I felt in dam 1st & then mobile passed away & i remained alive)
    * Victory over friend is our biggest defeat(Irfan bhai is real winner because he allowed u to win...but congratulation to u for winning match)
    * Your marathi is superb... it was very difficult to read some words... what a richness and hold you have on marathi... khup chan!

    ReplyDelete
  4. धन्यवाद आशिष...व्यायाम संबंधी रुग्णांना जागरूक करण्याचं काम , यानंतर मी नेहमी करेन. तुझ्या सर्व सूचनांची नोंद मी घेतली आहे. इतकी विस्तृत प्रतिक्रियेबद्दल पुनःश्च धन्यवाद☺.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दत्तू किटे

        .        23 जुलै 2017 वार रविवार, रविवारी रात्री आमच्या मेस(खानावळ) बंद असायच्या. नाईलाजाने (नाईलाजाने कसलं हो ! आम्ही तर चातकासारखी वाट बघायचो रविवारची) आम्ही बाहेर जेवायला जायचो. खिसे भरलेले असले की सतत बाहेर जेवायला जाता येत. पण घरचे बरोबर दुखती नस पकडत, महिन्यात येणाऱ्या 4 रविवारी बाहेर जेवता येईल इतकाच चंदा पाठवल्या जायचा. अधात मधात बाहेर जेवायला गेलं की मित्रांकडे उधारी व्हायची. कधीना कधी द्याव्या लागणाऱ्या उधारीमुळे पुढील सगळेच दिवस तंगीत जायचे. त्यापेक्षा फक्त रविवारीच जिभेचे चोचले पुरवले जायचे. तश्या आमच्या मेस ह्या अव्वल दर्जाच्या सहकारी(co-operative) मेस होत्या. आम्ही, आमच्यासाठी, आमच्या पोटाच्या कल्याणासाठी चालवलेली खानावळ म्हणजे ह्या सहकारी मेस(लोकशाहीच्या व्याख्येच्या सुरात वाचावे. याविषयी नंतर कधी तरी). तर आठवाड्यातले 6 दिवस अगदी घरच्यासारखं जेवल्यानंतर रविवारी जीव चटपटीत खायला अगदी असुसल्या जायचा. पाऊले आपोआप ढाब्याकडे वळायची. औरंगाबाद शहरापासून 14-15 कि.मी. अंतरावर दौलताबाद रोडवर डोंगरे मामांच्या 'साईकृपा' ढाब्यावर आमची मैफिल रंगायची. नेहमीचे सदस्य म्

जैविक व रासायनिक ब्रम्हास्त्रे भाग-१.

       .             ऑगस्ट 1906 साल अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्य. ऑईस्टर बे या नासाऊ प्रांतातील शहरात एका आलिशान घरात एक मुलगी आजारी होती. त्या काळात अमेरिका आता इतकी जरी पुढारलेली, प्रगत, आत्ममग्न नसली तरी त्या मुलीच्या आजारपणाशी बाकीच्यांचा संबंध येण्याचे वा इतका गवगवा होण्याचं काही एक कारण नव्हतं. ज्या घरात ती आजारी होती ते घर नेहमी पर्यटकांसाठी भाड्याने दिल्या जात असे. अश्याच पर्यटकांपैकी ती सुद्धा तिच्या परिवारासमवेत येथे सुट्ट्यांचा आनंद लुटायला आली होती. घर प्रशस्त आणि समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे कोणत्याही पर्यटकास चटकन पसंत पडे. पण ऐनवेळी आजारी पडल्यामुळे सगळा खेळखंडोबा झाला होता. इतर सदस्य तिची सर्वतोपरी काळजी घेत होते. पण तरी तिचा ताप काही केल्या उतरेना. लक्षण टायफॉईडची (विषमज्वर)असल्याचे बोलले जात होते. कारण इतरत्र टायफॉईडचे रुग्ण आढळले होते. वर्तमानपत्रातही टायफॉईडच्याच बातम्या येत होत्या. साथच असावी बहुदा. म्हणून रोगाच्या निदानाची घरातल्या लोकांनाच चटकन कल्पना आली. पण दुर्दैवाने घरातील इतरही 6 सदस्य लवकर आजारी पडले. अगदी त्याच लक्षणांसहित. आता मात्र बाब गंभीर होती. घरातील

पैठणी दिवस भाग-२

   .                ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सरांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज.             संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला. पाणी आणि आकाश इतके बेमालूमपणे एकमेकांत गुंफले होते की, त्यांना विभिन्न करणे केवळ अशक्य.              वेळापत्रकानुसार 2 जणांना अपघात विभागात 24 तास आपल्या कामावर हजर रहावे लागे. पैकी रात्री रुग्ण आला तर मामा (वर्ग 4 कर्मचारी) खोलीवर बोलावण्यास येई. उर्वरित सर्वांना बाह्यरुग्ण विभागात (ओ. पी. डी.) 2 वेळा जावे लागे. सकाळी 10-1 आणि दुपारी 2-4 हे कामाचे तास सोडले तर इतरवेळी तुम्ही काहीही करू शकत होतात. कामाच्या वेळी सुद्धा आम्ही बरीच दिरंगाई केली